कात्रज – “मतदारांनो, माझ्यावर मतांचे कर्ज वाढवा. ते विकासकामांच्या रूपाने मला त्याची परतफेड करताना रात्रीची झोपसुद्धा लागली नाही पाहिजे, असे भावनिक आवाहन हडपसर मतदार संघातील मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी आज केले.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण मतदार संघ दुचाकी रॅलीने मोरे यांनी पिंजून काढला. विशेष म्हणजे मोरे यांनी संपूर्ण प्रचार हा पायी फिरुन केला आहे. पण शेवटच्या दिवशी पूर्ण मतदार संघ फिरायचा असल्याने त्यांनी दुचाकी रॅली काढली. सकाळपासून पावसाचा अडथळा दूर सारत तब्बल सहा तासांत मोरे यांनी सगळा मतदार संघ फिरुन काढला. कात्रज येथील भैरवनाथ मंदिराचे दर्शन घेऊन दुचाकी रॅलीला सुरुवात झाली.
त्यानंतर कोंढवा-महंमदवाडी, हडपसर गावठाण, मांजरी, केशवनगर, मुंढवा, बीटी कवडेमार्गे हडपसर भागांत रॅली फिरली. यामध्ये मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनसेचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी मतदार संघात ढवळून काढला. यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, योगेश खैरे, आरती बाबर, विशाल ढोरे, शिवाजी भडाळे मनसेचे नेते व कार्यकर्ते होते.