भीमा कोरेगाव चौकशी : पवारांची दुटप्पी भूमिका- माधव भांडारी

मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीच्या तपासाची मागणी करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. हेच पवार या घटनेची चौकशी एनआयएकडे सोपविण्याचा केंद्राच्या निर्णयावरही टीका करत आहेत, मग पवार यांचा नेमका विश्वास आहे तरी कोणावर असा सवालही भांडारी यांनी उपस्थित केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत माधव भांडारी यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला. पवार यांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे ( एसआयटी) सोपवावा, अशी मागणी केली होती. सध्या हा तपास राज्य पोलिसच करत आहेत. भंडारी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात काही व्यक्ती आणि संघटनांवर आरोप करणे सुरु केले आहे. या दंगलीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावरही पवार आणि राष्ट्रवादीच्या जबाबदार नेत्यांनी टीका केली आहे.

मात्र, या याप्रकरणी तपास करणाछया चौकशी आयोगापुढे सादर केलेल्या शपथपत्रात मात्र पवार यांनी आपण या संदर्भात कोणा व्यक्ती अथवा संघटनेवर आरोप करू इच्छित नाही असे स्पष्टपणे नमूद केले होते. याच शपथपत्रात पवार यांनी समाज माध्यमांवरही निर्बंध आणण्याची मागणी केली होती, याकडेही भांडारी यांनी लक्ष वेधले. आता राज्यात सत्तेत आल्यानंतर पवारांची भूमिका अचानक बदलली आणि ते व त्यांच्या पक्षाचे नेते काही व्यक्ती व संघटनांवर आरोप करू लागले आहेत, हे आश्‍चर्यजनक आहे, असे भांडारी म्हणाले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.