राष्ट्रवादीला आणखी धक्का : उद्धव ठाकरेंकडून पक्षप्रवेशाचा प्रस्ताव
रत्नागिरी: राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आल्याची कबुली दिली आहे. कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
भास्कर जाधव म्हणाले, होय, माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे आमंत्रण मला दिले आहे. मात्र याविषयी कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जाधव यांनी प्रस्ताव मान्य केल्यास 15 वर्षांनी शिवसेनेत त्यांची घरवापसी होईल. प्रारंभी, आपण कोणाचीही भेट घेतलेली नाही. शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत, असा दावा करणाऱ्या भास्कर जाधवांनी अखेर शिवसेनेचा भगवा पुन्हा हाती धरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पडलेले खिंडार आणखीनच रुंदावण्याची चिन्हे आहेत.