भरकटलेल्या भाजपचा पराभव निश्‍चित – शरद पवार

मुंबई – विकासाचा मुद्दा घेवून गुजरातपासून सुरू केलेले नरेंद्र मोदी यांचे 2014 मधील राजकारण यावेळच्या निवडणुक प्रचारात संपले आहे. त्यामुळे ते वेगळ्या मुद्यावर लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी विकासाच्या मुद्यावर बोलण्याचे टाळत राष्ट्रवाद आणि अन्य मुद्यावर लक्ष वळवण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे भरकटलेल्या भाजपाचा पराभव निश्‍चितच आहे, असे भाकित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार बोलत होते. त्यावेळी पवार यांनी मोदींच्या जाहीर सभेतील वक्तव्यांचा समाचार घेतला. एअर स्ट्राईकच्या मुद्याचे राजकारण करण्याच्या मोदी आणि भाजपाच्या मुद्यावर पवार म्हणाले की, जिनीव्हा कराराच्या दबावामुळे अभिनंदन याला जास्त काळ तुरूंगात ठेवणे पाकला शक्‍य नव्हते, मात्र त्याचेही भाजप सरकारने भांडवल करावे हे दुर्दैवी आहे.

राज्यात दुष्काळ आहे, गेल्या पाच वर्षात सरकारने दुष्काळ संपल्याचे सांगितले होते. मग आताची स्थिती का निर्माण झाली याची उत्तरे देण्याऐवजी ते पवार कुटूंबाचा मुद्दा काढत आहेत. हा देशाचा महत्वाचा मुद्दा होवू शकतो का? असाही सवाल त्यांनी केला. अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवला नाही, या सारखी वक्तव्ये पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने करणे योग्य नाही. जगात देशाची शांतताप्रियतेची प्रतिमा मलिन होत आहे, असे मत व्यक्त करणे योग्य नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्ती देशाच्या धोरणाला शपथेने बांधील असते. त्यामुळे त्यानी जपून बोलले पाहीजे, असेही पवार म्हणाले.
राज्यातील राजकीय घराण्यांच्या राजकारणाबाबत भाजपच्या धोरणाबाबत ते म्हणाले की, भाजपासोबत जे जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आपण इतके वर्ष ज्या विचारधारेसोबत होतो ती सोडताना विचार केला पाहिजे. गेल्या अनेक वर्षात पंतप्रधानपदाचा उमेदवार आधी जाहीर करण्याची प्रथा नव्हती, मनमोहनसिंग हे निवडणुकानंतर निवडण्यात आले होते. त्याच पध्दतीने यावेळी देखील योग्य व्यक्तिची निवड आम्ही करू शकतो. त्यामुळे या देशाने जी व्यवस्था मान्य केली आणि स्विकारली आहे. तिच्या विपरीत जाण्याचा प्रयत्न करणारांना जनतेने नाकारले आहे, असे इंदिरा गांधी याचे उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केले. देशात हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा जागृत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नातही त्यांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते आहे असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.