उंब्रजला सखी मतदान केंद्राची आकर्षक सजावट

उंब्रज – येथील रुक्‍मिणीबाई कदम कन्या शाळेतील मतदान केंद्रावर सुंदर सजावट करून मतदारांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. मतदारांसाठी मंडप उभारून सावलीसह पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. मतदारांसाठी आकर्षित केलेल्या आकर्षक मांडणीची चर्चा मतदारांमध्ये सुरू होती. येथील कन्या शाळेतील मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्रातर्फे मतदार जागृतीच्या सूचना फलकासह स्वागत कमान उभारून आकर्षक झालर लावल्याने एखाद्या शुभकार्याच्या प्रसंगी लावण्यात येणाऱ्या स्वागत कमानीप्रमाणे स्टेज उभारण्यात आले होते. मंडप उभारून मतदारांसाठी सावली करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची सुविधा वयोवृध्दांना बसण्यासाठी बाकडे ठेवण्यात आले होते. विशेषतः मतदान केंद्रावर सर्व महिला अधिकारी फेटा घालून उपस्थित होत्या. त्यामुळे येथील मतदान प्रक्रियेला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

दरम्यान, याच मतदान केंद्रावरील बुथ क्रमांक 214 मधील व्हीव्हीटी पॅट मशिन सकाळी 11 वाजणेच्या सुमारास बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला. 11.45 वाजण्याच्या सुमारास संबधित अधिकारी उपस्थित झाल्यानंतर मशिन सिलबंद करण्यात आले. त्यावेळी 188 मतांची नोंद करुन घेण्यात आली. याच मतदान केंद्रावरील बुथ क्रमांक 219 वरील व्हीव्हीटी पॅट मशिन बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली. दुपारनंतर मतदान यंत्रणा सुरळीत पार पडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.