भादलवाडी, मदनवाडी तलावात आले पाणी

शेतकरीवर्गात समाधान ः रब्बी पिकांसाठी ठरणार फायदेशीर
भिगवण  (वार्ताहर) –इंदापूर तालुक्‍यातील भादलवाडी व मदनवाडी आदी तलावांमध्ये खडकवासला धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. तलाव पाण्याने भरल्याने परिसरातील शेतकरीवर्गाने समाधान व्यक्‍त केले आहे.

या तलावांवर लगतचे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे परिसरातील पशू-पक्षी यांचीही सोय यामुळे होणार आहे. भादलवाडी तलाव हा तर सारंगागार म्हणूनच ओळखले जाते. तलावात पाणी सोडण्यात आले असले तरी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी केली जात आहे. पोंधवडी (ता. इंदापूर) येथील तलावात मात्र नव्याने पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणीही केली जात आहे.

मदनवाडी येथील सहकारी सोसायटीचे चेअरमन विष्णूपंत देवकाते यांनी सांगितले की, मदनवाडी तलावात पाणी सोडल्याने मदनवाडी व सिद्धेश्‍वर निंबोडी (ता. बारामती) येथील शेतकऱ्यांची पाण्याची सोय झाल्याने रब्बीच्या पिकाचा पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधन व्यक्‍त केले जात आहे. खडकवासला धरण्यातील पाणी सोडल्यामुळे येथील परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच हे पाणी शेतीस उपयुक्त ठरले.

पाणी सोडण्यात अनियमितता
इंदापूर तालुक्‍यात असलेल्या तलावांमध्ये पावसाळ्यात पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील धरणांतून कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. मात्र मागील काही वर्षांपासून पाणी सोडण्यात अनियमितता असल्याने, पाण्याच्या आभावी परिसरातील शेतीचे नुकसान होत होते. चालू वर्षी अवकाळी पावसाने जिल्ह्यातील धरणे भरली होती. भीमा व नीरा या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. नीरा तसेच भीमा नदीतून पाणी वाहून जात असतानाही हे तलाव पाण्याने भरण्याची तजवीज केली जात नव्हती. 2019च्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत तालुक्‍यातील तलावांतील पाण्याचा विषय गाजला होता. सध्या पाणी सोडण्यात आले असले तरी हे तलाव 100 टक्के भरण्याची मागणी केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.