Ben Stokes, T20 World Cup 2024 :- आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला आयपीएलच्या १७ व्या मोसमानंतर १ जूनपासून सुरुवात होणार आहे. याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने या स्पर्धेतून माघार घातली आहे. या दिग्गज खेळाडूला विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते, मात्र त्याने माघार घेतली आहे. हा अनुभवी खेळाडू संघाचा भाग राहिला असता, तर तो स्वबळावर सामने जिंकून देऊ शकला असता, मात्र या खेळाडूच्या माघार घेण्याने संघासह करोडो चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळानेच ही माहिती दिली आहे. इंग्लंडचा पुरुष क्रिकेटपटू बेन स्टोक्सने पुष्टी केली आहे की, जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकापूर्वी निवडीसाठी त्याचे नाव विचारात घेतले जाणार नाही. निवेदनात पुढे म्हटले आहे की, इंग्लंडच्या कसोटी कर्णधाराचे लक्ष केवळ कसोटी क्रिकेटसाठीच नव्हे तर भविष्यातील सर्व क्रिकेटसाठी गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असणे आहे. इंग्लंड संघ वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध दोन-तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
बेन स्टोक्सने आपल्या निवेदनात सांगितले की, ‘मी कठोर परिश्रम करत आहे आणि क्रिकेटच्या सर्व प्रकारातून अष्टपैलू म्हणून माझी भूमिका निभावण्यासाठी माझा गोलंदाजी तंदुरुस्ती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे आयपीएल आणि विश्वकरंडक न खेळणे हे मला भविष्यात अष्टपैलू खेळाडू बनण्यास मदत करेल.
स्टोक्सने आतापर्यंत इंग्लंडकडून ४३ टी-२० सामने खेळले आहेत. या कालावधीत बेन स्टोक्सने २१.६७ च्या सरासरीने ५८५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचबरोबर बेन स्टोक्सनेही या कालावधीत २६ विकेट्स घेतल्या आहेत. २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात बेन स्टोक्सचे मोठे योगदान होते. त्याने अंतिम सामन्यात ४९ चेंडूत नाबाद ५२ धावा करत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.