पुणे – पोलिसांना फोन करून सांगेन असे म्हणत दोघात झालेल्या भांडणातून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. हा प्रकार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास बोपोडी येथील रेल्वे फाटकाजवळ घडला आहे. या प्रकरणी राहील मकसूद सय्यद (23, रेल्वे फाटकाजवळ पठाण चाळ बोपोड) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लॉरसन सेल्वराज याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहील हा सार्वजनिक शौचालयात निघाला होता. यावेळी आरोपी लॉरसन याने त्याला पाहून घरी जा नाहीतर पोलिसांना फोन करून सांगेल असे म्हटले. यावरून दोघात भांडण झाले. त्यावेळी लॉरसन याने राहील याला शिवीगाळ करत डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पाडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र हे सर्व काम पोलिसांचे आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही कारणासाठी कायदा हातात न घेण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.