पुणे : पूरजन्य परिस्थितीच्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन घ्या, तसेच पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करताना स्थानिकांचा सहभाग वाढवा. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी कामे प्राधान्याने करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः यात लक्ष घालून ही कामे पूर्ण करावीत, अशा सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका- नगरपंचायतींनी केलेल्या तयारीचा शिंदे यांनी आढावा घेतला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस प्रधान सचिव सोनिया सेठी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नियंत्रण कक्ष, अग्निशमन दलासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश नगरविकासमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, पावसाळ्यात आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, उपकरणांच्या खरेदीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्ह्यांनी नियोजन समितीच्या निधीतून अत्यावश्यक खरेदी करावी, अशी सूचनाही नगरविकासमंत्र्यांनी यावेळी दिली.