मुंबई – सध्या कोविड-19 मुळे सगळेजण घरातच असलयाने ई-व्यवहार वाढले आहेत. मात्र, अज्ञात फोन क्रमांकावरून तुमच्या बॅंकेचे प्रतिनिधी असल्याचा दावा करणारे फोन कॉल, तुम्हाला नुकताच प्राप्त झालेला ओटीपी (वन टाईम पासवर्ड)सामायिक करण्याबद्दल विचारणारा संदेश, या माध्यमातून फसवणूक करणारे ठग सतत तुमच्या पैशांवर प्रवेश मिळविण्याचा मार्ग शोधत असतात. फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळया मार्गांविषयी माहिती करुन, सावधगिरी बाळगल्यास तुम्ही त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची चिन्हे ओळखू शकता आणि त्यांच्या जाळयात अडकणे टाळू शकता.
इंटरनेटवरून होणारे आर्थिक व्यवहार, मोबाइल ऍपचा वाढता वापर यामुळे सायबर गुह्यांच्या प्रमाणात सध्या प्रचंड वाढ होत आहे. ई-शॉपिंग, ऑनलाइन बॅंकिंग, मोबाइल ऍपमधून होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारांतून मोठया प्रमाणात पैसे हडप केले जातात. बॅंक खाते, डेबिट-पेडिट कार्ड, इमेल याचा पिन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये, असे वारंवार सांगण्यात येते. बॅंकांसह सायबरतज्ञ, पोलिस यंत्रणाही सूचना करत असतात. परंतु बॅंकेतून कॉल आल्याचे भासवणाऱया भामटयांवर अतिविश्वास ठेवणे ग्राहकांना भोवते. लोकांचा ऍपवर, बॅंकेच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याने त्याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही.
गुन्हेगारांकडे काही वेगळे, अद्ययावत वा नवीन तंत्रज्ञान नसते. परंतु ते मानवी कल लक्षात घेऊन सापळा रचतात. त्यातून इमेल, ऍप, लिंक, बोगस कॉल सेंटर वगैरे सापळे रचले जातात. त्या सापळयात अडकविण्याचे तंत्र मोडून काढण्यासाठी सर्वसामान्यांनी सतर्क रहावे, असे सायबर क्राईम नियंत्रण विभागामार्फत कळवण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलवरून ई-व्यवहार करताना त्यातील खाचाखोचा ठाऊक नसतात. गुन्हेगार त्याचाच फायदा उठवितात. हे लोक तुमची आयुष्यभराची पुंजी पळवू शकतात. ई-व्यवहार काही सेकंद, मिनिटांचा असतो. देश वा परदेशातून केल्या जाणाऱया घोटाळयाचा तपास करणे बऱ्याचदा अवघड ठरते. ऑनलाइन ठगांकडून ही रक्कम एटीएमवरुन काढून घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकदा ही रक्कम काढली गेली की त्याचा तपास करणे अवघड ठरते.
सावधगिरीसाठी काही उपाय…
1. कोणाशीही तुमच्या बॅंक खात्याचे तपशील (कार्ड नंबर, कालबाह्य तारीख, पिन) शेअर करू नका.
2. तुम्हाला तुमची बॅंक किंवा मोबाइल ऑपरेटरकडून असल्याचा दावा करणाऱ्या ई-मेल किंवा ओटीपी प्राप्त झाल्यास, अधिकृत हॅंडल/ई-मेल पत्त्यावरून ते पाठविले गेले असल्याची खात्री करा.
3. तुमच्या खात्यातून केल्या जाणाऱया व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी ई-मेल आणि एसएमएस अलर्टसाठी सबस्क्राइब करा.
4. तुमच्या बॅंक व्यवहारांचा इतिहास नियमितपणे तपासा आणि कोणत्याही अनियमिततेसाठी निरीक्षण करा.
5. केवळ ई-व्यवहार नाही तर, सोशल मीडियावर वावरताना विशेष काळजी घ्यावी. त्यावर लाइव्ह लोकेशन, खासगी माहिती, फोटो शेअर करू नयेत. गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन मॉर्फिंग आदी स्वरूपात महिलांना लक्ष्य करू शकतात.