#CWC19 : खेळातील राजकारणावरून विश्‍वचषकाला गालबोट

भारताकडून आयसीसीपुढे खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित

लीड्‌स – भारत आणि श्रीलंका यांच्यात शनिवारी झालेल्या मॅचमध्ये भारताने सहज विजय मिळवला असला तरी भारताची बॅटिंग सुरू असताना एक विमान मैदानावर घुटमळताना दिसत होते. रोहित शर्मा शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर हा प्रकार सुरू होता. हे विमान प्रवासी किंवा खासगी विमान नव्हते. तर या विमानाच्या माध्यमातून भारत विरोधात संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर, दुसऱ्या एका विमानावर काश्‍मीर स्वतंत्र करावे अशा प्रकारचा संदेश लावलेला होता. या घटनेची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली असून, आयसीसीपुढे खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या संदर्भात लेखी तक्रार करण्यात आली आहे.

भारत-श्रीलंका सामन्याच्या दरम्यान, आकाशात सोडण्यात आलेल्या बॅनरमुळे खेळात राजकारण शिरल्याचे दिसत आहे. मॅच सुरू झाल्यानंतर काही वेळातच काश्‍मीरसाठी न्याय अशी अक्षरे लिहिलेला बॅनर विमानातून सोडण्यात आला होता. त्यानंतर “भारतातील नरसंहार बंद करा, काश्‍मीरला मुक्‍त करा’ अशा आशयाचा बॅनर फडकावण्यात आला होता. त्यानंतर भारताची बॅटिंग सुरू झाल्यानंतर पुन्हा मैदानावर एक विमान घिरट्या घलताना दिसले. त्यात मॉब लिचिंग रोखण्यासाठी मदत करा, असा बॅनर फडकावण्यात आला. यासंदर्भात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, हे कदापि स्वीकार केले जाणार नाही. आम्ही आयसीसीला याबाबत लेखी तक्रार केली आहे. भारत-श्रीलंका मॅचदरम्यान झालेल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्‍त केली आहे. जर सेमीफायनलदरम्यान पुन्हा अशी एखादी घटना घडली तर, ते फार दुर्दैवी होईल. आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा सर्वोच्च आहे.

विशेष म्हणजे, या मैदानावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात मॅच झाली होती. त्यावेळी स्टेडियमच्या वर उडणाऱ्या विमानांतून पाकिस्तान विरोधी बॅनर फडकावण्यात आले होते. त्यात पाकिस्तानातील हिंसाग्रस्त बलुचिस्तानमधील लोकांच्या बेपत्ता होण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या मॅचच्या दरम्यान दोन्ही देशांतील समर्थकांमध्ये हाणामारीच्या घटनाही घडल्या होत्या. त्यातील काही प्रेक्षकांना हाकलून देण्यात आले होते. आयसीसीने या प्रकारांची गंभीर दखल घेतली असून, पुन्हा अशी घटना घडल्याबद्दल खेद व्यक्त केला.

दरम्यान, कोणत्याही राजकीय संदेशाला स्वीकार केले जणार नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले असून मैदानावरून विमान उडणार नाही. याची खबरदारी स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी आयसीसीला ग्वाही दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.