बारामती – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे रयत भवन पाडून त्याठिकाणी व्यावसायिक इमारत उभी करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रयत भवन येथे पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
कार्यक्रमास संभाजी होळकर, सचिन सातव, योगेश जगताप, संदीप जगताप, इम्तियाज शिकीलकर, बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले, दिवसेंदिवस कायदे कडक होत आहेत. मार्केट कमिट्या चालविणे तसे अवघड आहे. स्वतःचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने पेट्रोल तसेच गॅस पंप सुरू केले आहेत. आगामी काळात आर्थिक मजबुतीकरणासाठी व्यावसायिक इमारत उभारण्याचा मानस आहे. रयत भवन च्या जागी व्यावसायिक इमारत उभारण्यात येणार आहे. जवळपास एक लाख स्क्वेअर फुट बांधकाम त्याजागी करण्यात येणार आहे. त्यामध्ये तीनशे पन्नास आसनक्षमता असणारे ऑडिटेरियमची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मार्केट कमिटीच्या विकासासाठी आत्तापर्यंत 65 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामध्ये विविध विकास कामे करण्यात आली. झारगडवाडी येथील 31 एकर जमिनीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे दिला असून त्या ठिकाणी जळोची येथील जनावरे बाजार भरण्यात येणार आहे. मार्केट कमिटी राज्यात टॉप टेन मध्ये आले असली तरी देखील मी मात्र समाधानी नाही. अजून प्रगती आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करा अशा सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक निबंधक मिलिंद टांगसाळे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी बाजार समितीच्या कार्याचा आढावा घेतला.
22 ऑक्टोबर पासून बारामतीत कापसाचा उघड लिलाव-
1981 पासून बंद असलेला कापसाचा लिलाव बारामती मार्केटमध्ये सुरू होणार आहे. 22 ऑक्टोबर पासून कापसाचा उघड लिलाव करण्याचा निर्णय झाला आहे. फलटण बारामती श्रीगोंदा आधी भागातून कापसाची आवक बारामती मार्केट कमिटीमध्ये होईल.