सातारा, (प्रतिनिधी) – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील बालक मंदिराच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा बनी मेळावा परळी येथील काडसिद्धेश्वर महाराज मठामध्ये नुकताच उत्साहात झाला.
मुख्याध्यापिका सौ. मंजिरी देशपांडे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सशाच्या वेशातील दोन बनींनी उड्या मारत मुख्याध्यापिकांना मेळाव्याच्या ठिकाणी आणले. बनीचे ध्येय आणि नियमांची माहिती देण्यात आली. श्लोक, प्रार्थना, भजन घेण्यात आले. ‘पळसाला पाने तीन’ आणि ‘म्हातारीची शेती होती’ ही दोन गाणी मुलांनी गायिली. मुलींसाठी पासिंग बॉल आणि फुटबॉल हे खेळ घेण्यात आले.
शिक्षिकांनी परिसरातील झाडे आणि तेथे असलेल्या गायींची महिती दिली. मुलांनी श्रीरामाचा जप केला. शालेय समितीचे अध्यक्ष सीए. सारंग कोल्हापुरे, सोसायटीचे विश्वस्त अनंत जोशी व सदस्य अमित कुलकर्णी यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.