सातारा, (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा राज्याचे अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
नियोजन भवनात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या सीईओ याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, निवडणूक उपायुक्त नीलिमा धायगुडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, परीविक्षाधीन आयएएस अधिकारी चंद्रा, मतदार नोंदणी अधिकारी, पोलीस उपअधीक्षक उपस्थित होते. यावेळी मतदान केंद्रांची व्यवस्था, मनुष्यबळ, मतदार नोंदणी, कायदा सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाई, दाखल गुन्हे याबाबत सादरीकरण करण्यात आले.
मतदारयाद्या अद्ययावतीकरणासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे जिल्ह्यात नवमतदारांचा टक्का लक्षणीयरित्या वाढल्याची माहिती जितेंद्र डुडी यांनी दिली. यामध्ये 1,08,754 नवमतदारांची नोंदणी झाली असून, 1,32,634 मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या 25,46,463 झाली आहे.
त्यात 12,97,027 पुरुष, 12,49,345 महिला आणि 91 तृतीयपंथी मतदार आहेत. 18 ते 19 वर्षे वयोगटात 3392, 20 ते 29 वर्षे वयोगटात 36,984 मतदारांची वाढ झाली आहे. भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीबरोबर त्यांना आधारकार्ड, रेशनकार्ड आणि जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे.
अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. त्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवकांना मतदार नोंदणीची संधी आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, तालुक्यांची ठिकाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार निश्चित करावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.
मतदार नोंदणी करताना मतदारांनी अचूक पत्ते न नोंदवल्याने टपालाने मतदान ओळखपत्रे वितरणात काही वेळा अडचणी येत आहे. पोस्टाकडून परत आलेल्या ओळखपत्रांचे बीएलओकडून वितरण करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर 16 नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, क्षेत्रीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यात 43 स्थायी निगराणी पथके व 49 भरारी निगराणी पथके नियुक्त करण्यात आली आहे. या सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात 3,019 मतदान केंद्रे आणि सहा सहाय्यक मतदान केंद्रे आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केद्रांच्या किमान 50 टक्के (1510) मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. मोबाइल नेटवर्क नसलेल्या 31 मतदान केंद्रांमध्ये संदेश वहनासाठी पोलीस, वन विभागाकडील व्हीएचएफ, वॉकी टॉकी, कोतवाल, पोलीस पाटील स्वस्त धान्य दुकानदार, ग्रामपंचायत शिपाई, ड्रोन यांची मदत घेण्यात येणार आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत मतदार जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक व्यवस्थापन आराखडा तयार करणेत आला आहे, अशी माहिती देण्यात आली.