पुणे – पुणे पोलिसांनी अटक केलेला घुसखोर कमरूल मंडलने बांगलादेश येथे बॉम्बस्फोट घडवला होता. त्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने भारतात घुसखोरी केली. सध्या तो पुण्यात वास्तव्य करत होता, अशी माहिती हडपसर पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
शहरामध्ये विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी हडपसर पोलिसांनी कमरुल मंडल याला अटक केली आहे. त्याने बेनापोल, बांगलादेश येथे बॉम्बस्फोट केले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींना आधार, पॅन कार्ड यासारखे भारतीय ओळपत्र पुण्यातील एजंटने तयार करुन दिल्याचे समजले.
तपासात अटक करण्यात आलेले बांगलादेशी आरोपी पश्चिम बंगाल येथील बॅंक खात्यातून बांग्लादेशात पैसे पाठवत असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय धागेदोरे असणाऱ्या रॅकेटचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. यातील पाच आरोपींना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.