पिंपरी – क्रिकेटच्या चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानावर जाऊन क्रिकेट पाहण्यासाठी खास पीएमपीने गहुंजे स्टेडियमपर्यंत बसची सुविधा पुरविण्यात येणार असून गुरुवारी (दि. 19) शहरात होणारा पहिला क्रिकेट सामना पाहण्यासाठी जाता यावे, म्हणून सोय केली आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मधील एकूण 5 सामने गहुंजे स्टेडियम येथे होणार आहेत.
पीएमपीकडून गहुंजे स्टेडियम येथे जाण्यासाठी पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बस स्थानकांवरून जादा बसचे नियोजन करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने कळविले आहे.
19 व 30 ऑक्टोबर आणि 1, 8 आणि 11 नोव्हेंबरला हे 5 क्रिकेट सामने होणार आहेत. शहरातील नागरिकांसाठी निगडी टिळक चौक बस स्थानकातून पीएमपी बसची सुविधा असून गुरुवारी (दि. 19) दुपारी 12 व दुपारी 12.30 वाजता बस सुटणार आहे. तिकीट दर हा प्रत्येकी जाताना आणि येताना 50-50 रुपये असणार आहे. या सुविधेमुळे स्टेडियमपर्यंत जाण्यासाठी होणाऱ्या कोंडीतून तसेच तेथे गेल्यावर वाहन पार्किंगच्या समस्या यातून क्रिकेट प्रेमींची सुटका होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी निगडी येथील टिळक चौकातून 30 ऑक्टोबर आणि 1 व 8 नोव्हेंबरला दुपारी 12 व दुपारी 12.30 वाजता बसची सुविधा असणार आहे. तर, 11 नोव्हेंबरला सकाळी 8.30 व सकाळी 9 वाजता बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.