पुणे : वारकरी संप्रदायातील धडाडीचे कीर्तनकार म्हणून ओळख असणारे आणि राज्यभर व्यसनमुक्तीची चळवळ चालवणारे हभप बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला आहे. त्यांच्यावर सातारा जिल्ह्यातील फलटण येथिल निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
बंडातात्या यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती निकोप रुग्णालयातील डॉक्टर जे.टी.पोळ यांनी दिली. बंडातात्या कराडकर हे पुण्याहून कीर्तन करुन फलटण तालुक्यातील पिंप्रद येथिल मठात आले होते. बंडातात्या यांना काल सकाळी त्रास जाणवू लागल्यावर निकोप हॉस्पिटलमध्ये त्यांच्या साधकांनी दाखल केले होते. यावेळी तात्यांचा रक्तदाब आणि शुगर खूपच वाढल्याने त्यांचा त्रास वाढला होता. यामुळे त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलमधील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार सुरु केले.
कालच्या उपचारानंतर तात्यांची प्रकृती स्थिर झाली. यानंतर त्यांचा MRI आणि अँजिओग्राफी केल्यावर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत थोडे ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. त्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होत असल्याने डॉक्टरांनी यावर देखील तातडीने उपचार सुरु केले.
दरम्यान बंडातात्या यांना आज पुणे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर डिजिटल सब्स्ट्रक्शन अँजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या तात्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे साधकांकडून सांगण्यात येत आहे. तात्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती मिळताच त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने फलटणमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.