मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार रणजित पाटील यांच्या प्रचार सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे विधान केले होते. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले होता. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, नवनीत राणांच्या या विधानाचा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
संजय शिरसाट यांनी, “राणा दाम्पत्य हे देवेंद्र फडणवीसांचे भक्त आहेत. एखाद्याचं भक्त असणं काही चुकीचं नाही. त्यामुळे त्यांना फडणवीस मुख्यमंत्री आहेत, हे वाटणं साहाजिक आहे. यामागे त्यांची भावना चांगली आहे. मी एकनाथ शिंदेंना मानतो, मग मी पण म्हणेल की एकनाथ शिंदे २५ वर्ष मुख्यमंत्री राहायला हवे. त्यामुळे नवनीत राणा यांनी त्यांचं मत व्यक्त केले आहे आणि यात काहीही चुकीचं नाही”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसेच राणा दाम्पत्याची इच्छा असेल तर फडणवीस मुख्यमंत्रीही होतीलही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अमरावतीत रणजित पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना, “देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनात आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. तेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात. गोवा, गुजरात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं, तिथे आपण न्यायासाठी लढणारा व्यक्ती बघितला. त्यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे.
तसेच आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण उपमुख्यमंत्री आहात. पण ज्या प्रकारे तुमच्या कामाचा आवाका आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांची कामं करता ते पाहून आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच आहात”, अशी नवनीत राणा यांनी दिली होती.