पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (23 जानेवारी) जन्मदिन. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत झालं. या कार्यक्रमाला राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांसह विरोधी पक्षातील नेतेही हजर होते. मात्र उमुख्यमंत्री अजित पवारच या कार्यक्रमाला गैरहजर होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, एकनाथ शिंदे, अनिल देसाई हे नेतेही उपस्थित होते.
सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीनंतर पाहणीसाठी ते त्याच दिवशी पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील विविध कामांचा आढाव घेऊन, आज ते बारामतीकडे रवाना होत आहे. अजित पवार हे मुंबईत नसल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला हजर राहू शकले नसल्याचे समजते.