वाघळवाडी- बजरंगवाडी (ता.बारामती) येथे ऊसतोड कामगारांच्या 24 मुलांचा गणवेश, दप्तर, पाटी असे शालेय साहीत्य देऊन प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 16) पार पडला.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग,टाटा ट्रस्टस् मुंबई आणि जनसेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून “आशा’ प्रकल्पाच्या माध्यमातून बारामती कार्यक्षेत्रातील करंजे, वाकी, चोपडज, वडगाव निंबाळर, कोऱ्हाळे बुद्रुक, खुर्द, बजरंगवाडी,लाटे या भागातील सर्वेक्षणात 6 ते 14 वयाची 128 मुले आढळली आहेत.
यातील 24 विद्यार्थ्यांचा बजरंगवाडी, लाटे, 15 फाटा, मतकरवस्ती कोऱ्हाळे या शाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नानासाहेब खलाटे, टाटा ट्रस्टसचे कार्यक्रम अधिकारी ज. म. परेश, सुनील भगत, सचिन खलाटे, संतोष शेंडकर, सरपंच रेणुका खलाटे, सुनील खलाटे, केंद्रप्रमुख सपंत जरांडे, नंदा साबळे, शाळा समितीचे अध्यक्ष सुनील साबळे, अशोक माळशिखारे उपस्थित होते. प्रवेशोत्सव कार्यक्रमावेळी मुलांना संचालक सचिन खलाटे यांनी 50 चप्पल जोड, लाटे गावच्या उपसरपंच मीनाक्षी माने यांच्याकडून 80 पाणी बॉटल, तर बजरंगवाडी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय हेगडे यांनी शालेय गणवेश, तर लाटे ग्रामपंचायत व सदस्या रेणुका खलाटे यांनी टूथ-ब्रश दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन गाढवे यांनी, प्रास्ताविक हेमंत गायकवाड यांनी तर सुनील काकडे यांनी आभार मानले.