Bahubeej of Pawar family : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडले आहे. या बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. त्यानंतर बंडानंतर यंदाची पहिली दिवाळी आहे. ज्यामध्ये सगळे पवार कुटुंब एकत्र दिसून येत आहेत.
दरम्यान, काल दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गोविंदबागेत अजित पवार गैरहजर राहिल्यानंतर आज काटेवाडीत सुप्रिया सुळे भाऊबीज साजरी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागेल असताना आता काटेवाडीत सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आज काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थनी दाखल झाल्या आहेत. याठिकाणी त्या अजित पवारांसोबत भाऊबीज साजरी करणार आहेत. राजकीय मतभेद एका बाजुला आणि कौटुंबिक सलोखा आणि नाती एका बाजुला असे यापूर्वीही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सुप्रिया सुळे या काटेवाडीत दाखल झाल्या आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर काही फोटो देखील शेअर केले आहेत.
दरम्यान, पवार कुटुंबाच्या एकत्र येण्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “कितीही मतभेद असले तरी एकत्र येणं ही पवार कुटुंबायांची खासियत आहे. तेच त्यांचं वैशिष्ट्ये आहे. दर दिवाळीला पवार कुटुंब एकत्र येतं. यावेळीही आले. पवार कुटुंब एकत्र आले असले तरी त्यांच्यातील मतभेद काही कमी झालेले नाहीत. मतभेद कायम आहेत’, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.