मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या तसेच घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. यावरून आता राजकारण तापलं आहे. मात्र भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी या घटनेनंतर पवारांवर टीका केली होती. त्याला आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.
संजय राऊत म्हणाले की, ज्या शरद पवारांनी, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं. तुम्ही उपरे आहात, पण बाडगा मोठ्याने बांग देतो, तो प्रकार आम्ही काल पाहिला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पवारांच्या घरावरील हल्ल्याचं समर्थन या महाराष्ट्रतील विरोधी पक्षातील लोकं करतायत हा दळभद्री पणाचा कळस आहे. अशा प्रकारे तुम्हाला सरकारला अडचणीत आणता येणार नाही. उलट तुमची बेअब्रु होतेय, असं राऊतांनी म्हटलं.
दरम्यान शरद पवारांचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात, संसदीय लोकशाही पद्धतीत, विकासात, शेती क्षेत्रात प्रचंड योगदान आहे. अशा नेत्याच्या घरावर तुम्ही हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
‘या जन्मी जे करतो ते याच जन्मी फेडावे लागते, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रीया दिली होती.
शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात अनेक संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नव्हता. अखेर मोठा फौजफाटा दाखल झाल्यानंतर प्रकरण आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं.