वडूज – खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील रस्त्यांची व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली असुन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते “पसंती तुमची, आंदोलन आमचे’ असे अनोखे आंदोलन करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला दुर्लक्ष पुरस्कार देऊन गौरविणार आहेत.
याबाबत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती, सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, डॉ.संतोष देशमुख, ऍड. संतोष भोसले, चंद्रकांत काटकर, धनंजय काळे, अशोक गोडसे, अमिन मुल्ला, एन.व्ही. जाधव, अजय खुस्पे, नतिश जाधव, लखन पवार, हर्षद यादव आदी उपस्थित होते.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कमी रहदारी असणाऱ्या रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. मात्र शहराला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांवर गतीरोधक बसवावेत तसेच शहरातील खड्डे बुजविण्याबाबत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
त्यानंतर मात्र बांधकाम विभागाने केवळ खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतली. सध्या शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची व शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा मोठा त्रास वाहनचालक, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निद्रीस्त भुमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दुर्लक्ष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणे, काळे फासणे, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांना रस्त्यावरील खड्डे दाखविणे अशा स्वरूपाची आंदोलनेही करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.