लाहोर – करोनामुळे सध्या क्रिकेट बंद असले तरी पुढील काळात होत असलेल्या मालिकांसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने एकदिवसीय सामन्यांच्या संघाचे कर्णधारपद अव्वल फलंदाज बाबर आझम याच्याकडे सोपविले आहे.
बाबरकडे टी-20 संघाचे नेतृत्व यापूर्वीच सोपविण्यात आले होते. आता त्याच्याकडे एकदिवसीय संघाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. कसोटी संघाचे नेतृत्व मात्र अझर अली याच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सर्फराज अहमदकडे होते. मात्र, कर्णधार म्हणून सर्फराजची कामगिरी देखील खूपच निराशाजनक झाली होती म्हणून अझर अलीकडे नेतृत्व दिले गेले.
मंडळाने करारपात्र खेळाडूंची यादी नव्याने तयार केली असून त्यातूनही सर्फराजला अ गटातून ब गटात सहभागी केले आहे. त्याच्यासह गेल्या काही महिन्यांत सुमार कामगिरी केल्यामुळे हसन अली, वहाब रियाज व महंमद आमिर यांनाही अ गटातून ब गटात करारबद्ध केले असले तरीही आता आगामी मालिकांसाठी त्यांची निवड होणार का याबाबत मंडळाने कोणतेही संकेत दिलेले नाहीत.