लाहोर – करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पाकिस्तानचा अव्वल फलंदाज अझर अली याने आपल्या त्रिशतकी खेळीच्या बॅटचा लिलाव केला. पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी संग्रहालयाने ही बॅट तब्बल 10 लाख रुपयांची बोली लावून आपल्याकडे घेतली.
चार वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत अझरने 302 धावांची खेळी केली होती. जगभरात करोनाचा कहर असताना पाकिस्तानातही गंभीर परिस्थिती आहे. त्यातच देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसल्याने अनेक खेळाडू मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. त्यातच आपला सहभाग घेत अझरने ही त्रिशतकी खेळी साकार केलेली बॅट तसेच अन्य काही क्रीडासाहित्य लिलावात विकून आलेली रक्कम करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दिली.
लिलावात या बॅटची बेस प्राइज 10 लाख रुपये ठेवण्यात आली होती त्याच रकमेत पुण्याच्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रीडा साहित्य संग्रहालयाने ही बॅट विकत घेतली. या लिलावातून 20 लाखांपेक्षाही जास्त रक्कम जमा झाली. ब्लेड्स ऑफ ग्लोरी या संग्रहालयात क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांच्या महान क्रिकेटपटूंच्या बॅट तसेच विविध गोष्टी पहायला मिळतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे संग्रहालय शहरातील मानबिंदू ठरले आहे.