बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आपल्या प्रोफेशनल आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत असतो. दीपिका पादुकोणपासून कतरिना कैफ आणि आता आलिया भट्टपर्यंत रणबीरचे आयुष्य नेहमीच चर्चेत आहे.
सध्या रणबीरची गर्लफ्रेंड आलिया असून ती अयान मुखर्जीच्या “ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर भेटली होती. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता दोन वर्षांपासून ते एकत्रित दिसत आहेत. रणबीर आणि आलिया एकमेकांबद्दल गंभीर असून ते लग्न करण्याचा विचार करत आहेत. तसेच चाहतेही त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्याच्या फॅन पेजवरून एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो सध्या खूपच व्हायरल होत आहे. त्यात एक टॅरो कार्ड रीडर रणबीरच्या लग्नाची भविष्यवाणी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूरसोबत अभिनेत्री सिमी ग्रेवाल आहे आणि त्यांच्यासमोर प्रसिद्ध सिलेब्रिटी टॅरो कार्ड रीडर मुनीषा खटवानी आहेत.
व्हिडिओच्या कॅप्शननुसार ही क्लिप 2010 सालची आहे जेव्हा रणबीर-दीपिकाचे ब्रेकअप झाले होते आणि तो कतरिनाला डेट करत होता. टॅरो कार्ड रीडरने आपल्या भविष्यवाणीच्या सुरूवातीस म्हटले आहे की रणबीरला अद्याप त्याची जीवनसाथी मिळालेली नाही. यात त्या म्हणाल्या आहेत की लग्नासाठी रणबीरला आणखी प्रतीक्षा करावी लागेल.
दरम्यान, मुनिषा खतवानीने यापूर्वी अनुष्का शर्मासाठी विराट कोहली, दीपिका पादुकोणसाठी रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रासाठी निक जोन्सचा अंदाज वर्तविला होता.