Ayodhya Railway Station : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज प्रभू श्रीरामाची नागरी अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. आज ते इथे विविध विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. त्यातील एक म्हणजे अयोध्येतील ‘अयोध्याधाम रेल्वे स्टेशन’. हे रेल्वे स्टेशन आजपासून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
जानेवारीत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी देशवासियांना खास भेट देत आहेत. याअंतर्गत अयोध्येला नवीन रेल्वे स्थानकाची भेटही मिळाली आहे. ‘अयोध्या धाम रेल्वे स्थानक’ अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. हे रेल्वे स्टेशन विमानतळाप्रमाणेच तयार करण्यात आले आहे. या ठिकाणच्या सोयीसुविधा या विमानतळाप्रमाणेच असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे रेल्वे स्थानक एकूण तीन टप्प्यात विकसित केले जात असून, त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याची पुनर्बांधणी 240 कोटी रुपयांमध्ये केली जात आहे. नवीन रेल्वे स्थानक एकूण तीन मजली बांधले जात आहे. आधुनिक सुविधांसोबतच या रेल्वे स्थानकात श्री राम मंदिराची संस्कृती आणि प्रतिमाही पाहायला मिळणार आहे.
रेल्वे स्थानकाबाहेरील मुख्य भागाची रचना शाही मुकुटाच्या स्वरूपात करण्यात आली आहे. यात भगवान रामाची प्रतीकात्मक रचना आणि धनुष्य देखील आहे. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी फूड प्लाझा, वेटिंग हॉल, चाइल्ड केअर रूम, क्लॉक रूम इत्यादी अनेक सुविधा आहेत.
यासोबतच लिफ्ट, एस्केलेटर, पर्यटकांसाठी माहिती केंद्र, टॅक्सी वे अशा अनेक महत्त्वाच्या सुविधाही रेल्वे स्टेशनवर आहेत. अयोध्येचे रेल्वे स्थानक दररोज 1 लाख प्रवाशांना हाताळण्यासाठी विकसित केले जात आहे. त्यामुळे भविष्यात या रेल्वे स्टेशनचा लाखो प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे दिसत आहे.