पिंपरी – रुग्णालयात रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा वापर जपून करण्यात यावा. अपव्यय टाळून ऑक्सिजनची जास्त गरज असलेल्या रुग्णांना प्राथमिकतेने ऑक्सिजन द्या, अशा मार्गदर्शक सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील 135 खासगी रुग्णालयांत करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यःस्थितीत रुग्णांमध्ये श्वसनाच्या वाढत्या तक्रारींमुळे ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. परंतु, ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे आणि मागणीत वाढ झाल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. सर्व रुग्णालयांमार्फत ऑक्सिजनचा मर्यादित आणि सुयोग्य पद्धतीने वापर करावा. ऑक्सिजनचा संभाव्य तुटवडा टाळण्याकरिता सहकार्य करावे.
करोनाबाधित रुग्णास खरोखरच ऑक्सिजनची आवश्यकता आहे काय, याची खातरजमा करावी. रुग्णांची सॅच्युरेशन पातळी 92 पर्यंत सुस्थितीत ठेवण्याकरिता प्रमाणातच ऑक्सिजनचा वापर करावा. रुग्णांच्या चेहऱ्यावर आकारानुसार लहान अथवा मोठ्या आकाराचे ऑक्सिजन मास्क उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे ऑक्सिजनची गळती होणार नाही. ज्या रुग्णांना मास्कची आवश्यकता नाही, त्यांना मास्कऐवजी “नसल प्रोलग्स’द्वारे ऑक्सिजन पुरवावा. त्यामुळे ऑक्सिजनचा अपव्यय होणार नाही, असे महापालिकेने म्हटले आहे.