पुणे -रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन इंजेक्शन्स जप्त करण्यात आली. आरोपी इंजेक्शनची प्रत्येकी 70 हजारांना विक्री करणार होते. यातील एक आरोपी जीमचालक आहे. त्याने भाड्याने जीम चालवायला घेतली होती. करोनामुळे त्याला सातत्याने जीम बंद ठेवावी लागली होती. यामुळे भाडे देऊ न शकल्याने त्याला जीम बंद करावी लागली होती.
राहुल सुनील काळे (22, रा. लोहगाव) आणि विजय दिनकर पाटील (31, रा. वडगाव शेरी) अशी आरोपींची नावे आहेत. डेक्कन जिमखानासमोर दोन व्यक्ती रेमडेसिविरच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व प्रशांत गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार सह्याद्री हॉस्पिटल व गरवारे महाविद्यालयाजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या अंगझडतीत तीन इंजेक्शन्स सापडली. यानंतर औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आरोपींकडे औषध विक्रीचा परवाना मागितला असता, तो मिळाला नाही. यामुळे औषध निरीक्षक जयश्री सवदत्ती यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. न्यायालयाने दोघांनाही 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, प्रशांत गायकवाड, अशोक माने, शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे, अमोल पवार व महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.