36 टक्के संस्थांनीच सादर केला लेखापरीक्षण अहवाल
पिंपरी – सहकारी संस्थांकडून लेखापरीक्षण करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब समोर आली आहे. दापोडी आणि पिंपरी-संत तुकारामनगर येथील दोन कार्यालयांकडे 2 हजार 371 सहकारी संस्थांनीच लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर केले आहेत. तब्बल 4 हजार 180 संस्थांनी हे अहवाल अद्याप सादरच केलेले नाही. म्हणजे 36.19 टक्के संस्थांनीच आत्तापर्यंत “ऑडिट रिपोर्ट’ सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्व सहकारी संस्थांनी प्रत्येक आर्थिक वर्षात निदान एकदा आपल्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्याची कायद्यात तरतूद आहे. दापोडी येथील उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (6) या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयाकडे आर्थिक वर्ष 2020-21 या कालावधीत 3 हजार 57 सहकारी संस्थांची नोंद झाली. त्यापैकी एकूण 965 सहकारी संस्थांनीच लेखापरीक्षण अहवाल सादर केले आहेत. टक्केवारीत हे प्रमाण 31.56 टक्के इतके अत्यल्प आहे. तुलनेत 2019-20 या आर्थिक वर्षात ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे प्रमाण 4.87 टक्क्यांनी जास्त राहिले. 2019-20 मध्ये 2 हजार 874 सहकारी संस्थांची नोंदणी झाली. त्यापैकी 1047 संस्थांनी लेखापरीक्षण अहवाल सादर केले. टक्केवारीत हे प्रमाण 36.43 टक्के इतके आहे.
पिंपरी-संत तुकारामनगर येथील उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (3) या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात 3 हजार 494 सहकारी संस्था लेखापरीक्षणासाठी पात्र ठरल्या. त्यापैकी 1406 संस्थांनी “ऑडिट रिपोर्ट’ सादर केला. टक्केवारीत हे प्रमाण 40.24 टक्के इतके राहिले. 2019-20 या आर्थिक वर्षात 3 हजार 400 सहकारी संस्थांपैकी 1 हजार 816 संस्थांनी लेखापरीक्षण अहवाल सादर केले. टक्केवारीत हे प्रमाण 53.41 टक्के इतके आहे. म्हणजे 2019-20 च्या तुलनेत 2020-21 मध्ये 13.17 टक्क्यांनी ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे प्रमाण घटले आहे.
दापोडी आणि संत तुकारामनगर-पिंपरी अशा दोन सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारित शहरातील सहकारी पतसंस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, सेवक पतसंस्था, स्वयंरोजगार सहकार संस्था, व्यापारी सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, पगारदार सेवक पतसंस्था आदी संस्था येतात. तथापि, दोन्ही कार्यालयांसाठी वेगवेगळे कार्यक्षेत्र निश्चित केलेले आहे.
सहकारी संस्थांनी मार्च 2021 पर्यंतचे लेखापरीक्षण अहवाल व त्यास अनुसरून दोष दुरूस्ती अहवाल तत्काळ सादर करावे, तसेच, ज्या सहकारी संस्थेने लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केलेली नाही त्या संस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी लेखापरीक्षकांची नेमणुक केलेली आहे. तरी, संबंधित लेखापरीक्षकांना सहकार्य करून तत्काळ लेखापरीक्षण पूर्ण करून घ्यावे.
– डॉ. शीतल पाटील, उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर