पुणे- महामेट्रोच्या बुधवार पेठ स्थानकासाठी सात तोटी पोलीस चौकी देण्यात आली आहे. सुमारे 600 चौरसफूट जागेत असलेली ही चौकी काढल्यानंतर मेट्रोकडून त्यांना तेवढीच चौकी बांधून देणे अपेक्षित आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून सुमारे साडेतीन हजार चौरसफूटाचे बांधकाम करून देण्याची मागणी करण्यात आल्याने या बांधकामावरून महापालिका आणि महामेट्रोत वाद सुरू आहे.
महापालिकेस जागेपोटी द्यायच्या मोबदल्याच्या रकमेतून हा एक कोटींचा खर्च महामेट्रो करणार असल्याने पालिकेने त्यावर आक्षेप घेतला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट या मार्गातील बुधवार पेठ स्टेशन साततोटी पोलीस चौकाच्या परिसरात येत आहे. या ठिकाणी महापालिकेची सुमारे अडीच हजार चौरसफूट जागा आहे. ही जागा पूर्णपणे महापालिकेच्या मालकीची आहे. त्यात सुमारे 300 चौरस फूट जागेत ही पोलीस चौकी बांधण्यात आली आहे. मेट्रोने ही जागा घेतल्यानंतर आता या ठिकाणी मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोकडून पुन्हा पोलीस चौकीचे बांधकाम करून दिले जाणार आहे. मात्र, पोलिसांकडून जवळपास तीन हजार चौरसफूटाचे बांधकाम असलेली चौकी बांधून मागण्यात आली आहे. या शिवाय, इतर एका जागेवर चार हजार चौरसफूटाचे बांधकाम मेट्रोने करून द्यावे, अशी मागणीही पोलिसांनी केली आहे. दोन्ही बांधकामासाठी एक कोटींचा खर्च येणार आहे.
जागा पालिकेची मोबदला पोलिसांना?
पोलीस चौकी असलेली जागा महापालिकेच्या मालकीची आहे. त्यामुळे, ही जागा महापालिकेने मेट्रोला दिल्याने तीची किंमत जवळपास एक कोटी रूपयांची आहे. हे शुल्क मेट्रोने पालिकेने देणे अपेक्षित असताना मेट्रोने मात्र, याच एक कोटीच्या रकमेतून पालिकेच्याच जागेत पोलीस चौकीचे 3 हजार चौरसफूटाचे बांधकाम तसेच इतर ठिकाणचे बांधकाम करण्यासाठी एक कोटींचा खर्च पालिकेला जे पैसे दिले जाणार आहेत. त्यातून करण्याची भूमिका घेतली आहे. त्याला महापालिकेने विरोध केला असून पालिकेस सर्व रक्कम मिळावी आणि मेट्रोने पदर खर्चाने पोलिसांना बांधकाम करून द्यावे, असे पालिकेने मेट्रोच्या अधिकाऱ्यांना सुनावले आहे.