पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सोमवारी स्वायत्त महाविद्यालयासाठी सुधारित नियमावली प्रसिद्ध केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विद्यापीठाची नियमावली आहे. स्वायत्त महाविद्यालयांना दोन पेक्षा अधिक अभ्यासक्रम सुरू करण्यास कोणतेही बंधन नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
स्वायत्त महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांच्या समस्या व अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाच्या सुकरतेसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आली होती. त्यानुसार अंमलबजावणी करताना काही स्वायत्त महाविद्यालयांना अडचणी येत असल्याचे दिसून आले. या महाविद्यालयांनी काही बदल सूचविले. त्या बदलांचा कुलगुरुंनी स्वीकार करून स्वायत्त महाविद्यालयांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्यात आली.
स्वायत्त महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांची समकक्षता विद्यापीठाकडून दिली जात होती. आता त्यासोबत स्वायत्त संस्थांसाठी “पीआरएन’ म्हणजेच पर्मनंन्ट रजिस्ट्रेशन नंबरही दिला जाणार आहे. त्याचा उपयोग ऍकॅडेमिक बॅंक ऑफ क्रेडिटच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा होणार आहे.
यापूर्वीच्या नियमावलीत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मर्यादा होत्या. आता एकाच वेळी एका विद्याशाखेत दोन पेक्षा अधिक अभ्यासक्रम अथवा तुकड्या सुरू करण्यास मुभा आहे. मात्र त्यासाठी भौतिक सुविधा व आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता करण्याची अट आहे. स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन अभ्यासक्रम सुरू करताना, त्याचा मसुदा शैक्षणिक वर्षाच्या दि. 31 मार्चपर्यंत विद्यापीठाकडे पाठविणे आवश्यक आहे. विद्यापीठाने संबंधित अभ्यासक्रमांना त्या शैक्षणिक वर्षाच्या 31 मेपर्यंत मान्यता देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शुल्क निश्चितीचे अधिकार
स्वायत्त महाविद्यालयांनी पाठ्यक्रमाचे शुल्क निश्चित करावयाचे आहे, असे नियमावलीत नमूद करण्यात आले. त्यामुळे स्वायत्त संस्थांना शुल्क ठरविताना कोणत्याही प्रकारचे बंधन राहणार नाही. मात्र विद्यापीठाच्या नियमानुसारच शुल्क निश्चित करणे आवश्यक राहणार आहे.
स्वायत्त महाविद्यालयाच्या सुधारित नियमावलीत सुस्पष्टता आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे आता सुकर होणार आहे. या नियमावलीत संस्थांच्या सर्व अडचणी विचारात घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुधारित नियमावलीत सुसूत्रता आहे.
– प्राचार्य राजेंद्र झुंजारराव, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर