सिडनी – उपकर्णधार रोहित शर्मा आणि नवोदित वेगवान गोलंदाज टी. नटराजन ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी सज्ज बनले आहेत. हा सामना येत्या गुरुवारपासून सुरू होत असून या दोघांच्या समावेशामुळे भारतीय संघाची ताकद वाढली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होणार आहेत हे आता निश्चित झाले आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी टी. नटराजनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर हिटमॅन रोहित शर्माही जवळपास 11 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सज्ज बनला आहे. चेतेश्वर पुजाराकडे संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, आता रोहित तिसरी कसोटी खेळणार हे निश्चित झालेले असल्याने ही जबाबदारी पुन्हा रोहितकडेच आली आहे.
रोहित गेल्या काही काळापासून हे पद सांभाळत आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यातील संघासह आता रोहित कसोटी संघाचेही उपकर्णधारपद सांभाळणार आहे. तीन दिवसांपूर्वी रोहित विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून भारतीय संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला. केवळ तिसऱ्या कसोटीत रोहित सलामीला फलंदाजी करणार की मधल्या फळीत, याबाबत बुधवारी निर्णय घेतला जाणार आहे.