पुणे – करोना विषाणूच्या “ब्रिटन स्ट्रेन’चे पुण्यातील बाधितासह राज्यात आठ जणांमध्ये लक्षणे आढळली आहेत. पुणे, मीराभाईंदर आणि ठाणे इथे प्रत्येकी एक आणि मुंबईमध्ये तब्बल 5 बाधितांमध्ये “ब्रिटन स्ट्रेन’ ची लक्षणे असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी ट्विट करून दिली. मात्र, पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील संबंधित रुग्णाला ब्रिटन स्ट्रेनचाच संसर्ग झाल्याचे स्पष्ट केले.
ब्रिटनहून पुण्यामध्ये आलेल्या 26 वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली होती. हा तरुण गोखलेनगरमधील रहिवासी आहे. त्याचे तरुणाचे 26 डिसेंबर 2020 रोजी “जिनोमिक सिक्वेन्सिंग’ टेस्टसाठी सॅंपल घेण्यात आले होते. त्याचा अहवाल ब्रिटनहून आल्यानंतर दहा दिवसांनी या तरुणाची करोनाची टेस्ट करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह आढळला, मात्र त्याला करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्याला डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर 26 डिसेंबर 2020 रोजी त्याची “जिनोमिक सिक्वेन्सिंग टेस्ट’ करण्यात आली. त्याचे नमुने “एनआयव्ही’ कडे पाठवण्यात आले. “एनआयव्ही’चा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याला “ब्रिटन स्ट्रेन’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
14 दिवसांच्या विलगीकरणानंतर त्याच्या पुन्हा टेस्ट करण्यात आल्या. त्या तीन टेस्टमधील एक टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला डॉ. नायडूमध्येच ठेवण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा त्याच्या टेस्ट केल्यानंतर त्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे त्याला डिस्चार्ज दिला असून, त्याला गृहविलगीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. मात्र सद्यस्थितीत त्याच्या सगळ्याच टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांच्याही टेस्ट निगेटिव्ह आल्याचे डॉ. वावरे यांनी नमूद केले.
दरम्यान, ब्रिटनहून आलेल्या 4,836 नागरिकांपैकी 3,390 जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील 72 जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यामध्ये मुंबईतील रुग्णांची संख्या जास्त असून, तेथे 30, पुण्यात 14, ठाण्यात 8, नागपूरमध्ये 9, नाशिक, औरंगाबाद, रायगड आणि बुलढाणा येथे प्रत्येकी दोन, उस्मानाबाद, नांदेड आणि वाशिम येथे प्रत्येकी एक असा समावेश आहे. या करोनाबाधितांपैकी 68 जणांची “जिनोमिक सिक्वेन्सिंग टेस्ट’ करण्यात आली असून, अद्यापपर्यंत त्यातील आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग सुरू
करोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील नातेवाईक, व्यक्तींचे ट्रेसिंग सुरू असून, त्यातील 495 जणांना शोधण्यात यश आले आहे. त्यातील 293 जणांची करोना टेस्ट करण्यात आली असून, त्यातीलही 30 जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.