धक्‍कादायक : फोन चार्जिंगला लावून गाणे ऐकणे तरुणीला बेतले जीवावर

नवी दिल्ली : कझाकिस्तानमध्ये फोन चार्जिंगला लावून गाणी ऐकणं एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. कारण फोन चार्जिंगला लावून गाणी ऐकता ऐकता झोपी गेलेल्या तरुणीचा फोनचा स्फोट होऊन दुर्देवी मृत्यू झाला आहे. 14 वर्षीय अलुआ एस्टेकीझी अब्झल्बॅक असे मृत मुलीचे नाव आहे.

अलुआ फोन चार्जिंगला लावून गाणी ऐकत झोपली होती मात्र दुसऱ्या दिवशी कुटूंबियांना ती मृत अवस्थेमध्ये अढळली. अलुकाने उशीजवळ ठेवलेल्या फोनचा स्फोट झाल्याने तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. जेव्हा घरच्यांनी तिच्या बेडरुमचा दरवाजा सकाळी उघडला तेव्हा ती मृत अवस्थेत अढळून आली. फोन चार्जिंगला लावलेल्या अवस्थेत तिच्या उशीजवळ होता.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार पोलिसांच्या तपास पथकाने या मुलीचा मृत्यू फोनचा स्फोट झाल्याने झाला असल्याचे म्हटले आहे. फोन चार्जिंगला लावला असता तो जास्त प्रमाणामध्ये गरम झाल्याने त्याचा स्फोट झाला असं पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. हा फोन कोणत्या कंपनीचा होता यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

अलुआ असा दुर्देवी अंत झाल्याने तिच्या मैत्रिणींना मोठा मानसिक धक्का बसला आहे. मला अजूनही या गोष्टीवर विश्वास होत नाहीय, अशी पोस्ट तिच्या जवळच्या मैत्रिणीने सोशल नेटवर्किंगवर केली आहे. तू माझी बेस्ट फ्रेण्ड होतीस. लहानपणापासून आपण एकत्र होतो. तुझ्याशिवाय मी स्वत:चा विचारही करु शकत नाही. मला तुझी खूप जास्त आठवण येईल, असे आयझन डोलाशेवा या तिच्या मैत्रिणीने सोशल नेटवर्किंगवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेमुळे मोबाईल फोनची सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.