बडोदा – भारतीय संघाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक अतुल बेदाडे यांची आपल्या बडोदे संघातील महिला क्रिकेटपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली आहे. बेदाडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
बेदाडे यांची तक्रार काही महिला क्रिकेटपटूंनी केली होती. प्रशिक्षण देताना तसेच खेळाडूंशी संवाद साधताना बेदाडे गेले काही दिवस गैरवर्तन करत होते, असेही या आरोपात खेळाडूंनी सांगितले आहे. बडोद्याचा महिला कक्रिकेटपटूंचा संघ हिमाचल प्रदेशमध्ये स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दाखल झाला होता.
तिथे बेदाडे यांनी महिला क्रिकेटपटूंशी गैरवर्तन केल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर बेदाडे यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
बेदाडे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी करण्यात आलेला हा खोडसाळपणा असल्याचे बेदाडे यांनी सांगितले आहे. बेदाडे यांनी भारतीय संघातर्फे 13 एकदिवसीय सामने खेळले असून एक धडाकेबाज व आक्रमक फलंदाज म्हणून ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावाजले गेले होते.