सोनिया गांधींचे मोदींना पत्र

बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी उपाययोजनांची मागणी

नवी दिल्ली – बांधकाम मजुरांसाठी आपत्कालीन उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. करोनाच्या अतिविशेष परिस्थितीचा विचार करता पंतप्रधानांनी “स्टेट बिलिंडग ऍन्ड अदर कन्स्ट्रक्‍शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड’च्या माध्यमातून बांधकाम मजुरांसाठी कल्याणकारी उपाययोजना केल्या जाव्यात. सार्वजनिक लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे या बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्या मजुरांसाठी ही उपाययोजना कल्याणकारी ठरू शकेल, असे सोनिया गांधींनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

सध्या कोहीड-19 या रोगामुळे सर्व जगात अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे काही अनौपचारिक क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. जगभरात कॅनडासारख्या काही देशांनी आर्थिक प्रतिसाद योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी वेतन अनुदानासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

करोनाच्या भीतीमुळे देशातील अनेक प्रमुख शहरांमधील लाखो बांधकाम मजुरांनी आपापल्या गावांकडे प्रस्थान ठेवले आहे. या साथीमुळे देशातील 44 दशलक्ष बांधकाम मजुरांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असेही सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.