मुंबई – दादर येथील शिंदेवाडी भागात एका पोलिसाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना समोर आली आहे. हे थरारनाट्य तब्बल चार तास चालले, अखेर वरिष्ठ पोलिसांनी विनवणी केल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाला.
मुंबईतील दादरमध्ये शिंदेवाडी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर असलेल्या चारमजली इमारतीत हा प्रकार घडला. शनिवारी सकाळी 10-11 वाजताच्या सुमारास संबंधित 29 वर्षीय पोलीस हवालदार इमारतीच्या कठड्यावर उभा असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संबंधित पोलीस हवालदार रडत होता. तो कोणत्यातरी मानसिक दबावाखाली असल्याचे दिसून येत होते. त्याने आपले पाकीट कठड्यावर ठेवले होते. तर बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रांवरुन त्याची ओळख पटली.
पोलिसांनी नंबर शोधून त्याचा गावी संपर्क करुन दिला. कुटुंबाशी फोनद्वारे बातचीत करुन दिली गेली. त्यानंतर अखेर काही वेळाने हवालदार आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाला. तब्बल चार तासांनी त्याची समजूत काढण्यात अग्निशमन दलाचे जवान आणि वरिष्ठ पोलिसांना यश आले.