बीजिंग – चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरात करोनाचे सहा नवीन रुग्ण सापडल्याने चीनने शीफादी या घाऊक फूड मार्केटसह अन्य अनेक बाजारपेठा तातडीने बंद केल्या आहेत. या मार्केट जवळील सहा लोकवस्त्यांमध्येही त्यांनी लॉकडाऊन सुरू केले आहे. राजधानी बिजींग मध्ये गेल्या तीन दिवसांत करोनाचे एकूण नऊ रुग्ण आढळून आले आहेत. तर अन्य भागातहीं 12 करोना रूग्ण आढळून आल्याने चीन करोना मुक्त झालेला नाही ही बाब स्पष्ट झाली आहे.
काल शुक्रवारी त्या देशात करोनासदृश आजाराच्या सात नवीन केसेस आढळून आल्याने त्यांच्याशी संबंधित 98 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या साऱ्या प्रकारामुळे बिजींग मधील सहा मोठ्या घाऊक बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. एका वृत्तानुसार शीफादी मार्केट मधील एकूण 45 मजुरांना करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसताना त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या मार्केटसह अन्य मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीजिंग हे शहर आत्तापर्यंत करोनापासून पूर्ण मुक्त शहर होते. वुहानमध्ये करोनाचा कहर सुरू असतानाही बीजिंगमध्ये करोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे तेथील प्रशासन पूर्ण हादरले आहे. बीजिंग शहरातील सर्व सरकारी यंत्रणांना युद्धसदृश स्थितीसाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. बीजिंग हे दोन कोटी लोकवस्तीचे शहर आहे.