पुणे – कोथरूड परिसरात अटक केलेल्या दहशतवादी प्रशिक्षित असून, याप्रकरणाचा तपास प्रगतीपथावर आहे, अशी माहिती महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे (एटीएस) पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिली. दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोहंमद युनूस मोहंमद याकू साकी (24) आणि मोहंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय 23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) यांना कोथरूड परिसरात ताब्यात घेण्यात आले. त्यांचा साथीदार मोहंमद शहनवाज आलम (वय 31) पसार झाला.
त्यांच्याकडील लॅपटॉपमधील काही कागपत्रांची पडताळणी करण्यात आली. तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. त्यात देशविघातक कृत्याबाबतचे साहित्य आढळून आले. तसेच बॉम्ब कसा तयार करायचा, याची माहिती आढळून आली. याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. तपासाचा आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक दाते बुधवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खान आणि साकी दोघे मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असून बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये ते फरार आहेत. ते गेल्या दीड वर्षांपासून पुण्याच्या कोंढवा परिसरात वास्तव्याला होते.
मात्र, त्याबाबत कोणतीही माहिती पोलीस किंवा तपास यंत्रणांच्या हाती नव्हती. याप्रकरणात दोघांशिवाय अन्य कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. तसेच, शहरात लगेचच काही घातपात घडण्याचा त्यांचा कट असल्याबाबतची कोणतीही माहिती तपास यंत्रणांना मिळालेली नाही. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. तसेच दोघांविरुद्ध विघातक कृत्ये घडवल्याचे कलम गुन्ह्यात लावण्यात आले आहे. काहीजणांची चौकशी सुरू आहे, दाते यांनी नमूद केले. दरम्यान, या प्रकरणात तपासासाठी एनआयए, आयबी आदी यंत्रणादेखील एटीएसच्या मदतीला आहे. त्यामुळे या प्रकरणात संयुक्त तपास सुरू आहे.
“अटकेतील दोन दहशतवाद्यांना हाताळणाऱ्या सूत्रधारांबाबत (हॅंडलर्स) महत्त्वपूर्ण माहिती तपासात मिळाली आहे. तपासासाठी देशातील विविध भागांत एटीएसची पथके रवाना झाली आहेत. तपासात आणखी माहिती समोर येईल.” – सदानंद दाते, पोलीस महासंचालक, एटीएस