दार एस सलाम (टांझानिया) – टांझानियाचे दिवंगत अध्यक्ष जॉन मागुफुली यांच्या निधनानंतर दार एस सलाम येथे 21 मार्च रोजी झालेल्या प्रचंड चेंगराचेंगरीमध्ये किमान 45 जण ठार झाले आहेत, अशी माहिती टांझानियाच्या पोलिसांनी आज दिली.
अध्यक्ष मागुफुली यांचे अंत्यदर्शन घेण्याची सोय एका स्टेडियममध्ये करण्यात आली होती. दिवंगत नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 45 जण ठार झाले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे. मृतांमधील 5 जण एका कुटुंबातील आहेत. त्यावेळी ही घटना आपत्कालिन म्हणून संबोधली गेली होती. मात्र चेंगराचेंगरीतील मृतांचा एकूण आकडा तेंव्हा घोषित केला गेलेला नव्हता.
मागुफुली यांचे 17 मार्च रोजी निधन झाले होते. निधनापूर्वी काही काळ ते सार्वजनिक कार्यक्रमांमधून दूर राहिले होते. टांझानियामध्ये दीर्घकाळापर्यंत करोनाच्या विषाणूला शिरकाव करू न देण्याच्या उपाय योजना त्यांनी राबवल्या होत्या.