साना : यमनची राजधानी साना येथे नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र चेंगराचेंगरी होऊन यात 78 लोकांचा मृत्यू झाला. तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजधानी सानाच्या जुन्या शहरात बुधवारी रात्री ही घटना घडली.
यावेळी काही व्यापाऱ्यांकडून गरीब लोकांना पैशांचे वाटप होणार होते. मात्र प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडली. या प्रकरणी दोन व्यापाऱ्यांना हुती बंडखोरांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीवर नियंत्रित मिळवण्यासाठी सशस्त्र हुती बंडखोरांनी हवेत गोळीबार केला होता. यातील एक गोळी विजेच्या तारेला लागल्याने स्फोट झाला.
या घटनेमुळे लोक घाबरले आणि पळापळी सुरू झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन लोकांचा बळी गेल्याचे प्रत्यक्षदर्शी अब्देल रहमान अहमद आणि याहिया मोहसीन यांनी सांगितलं. हा मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
#UPDATE | People stampeded at an event to distribute financial aid in Yemen’s capital late Wednesday, and at least 78 people were killed and dozens more suffered injuries, a Houthi official said, reports AP
— ANI (@ANI) April 19, 2023
या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन न केल्याने ही दुर्घटना घडल्याचं बंडखोरांचे ब्रिगेडियर अब्देल खलीक अल अघरी यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेली शाळा तात्काळ बंद करण्यात आली आहे. तसेच पत्रकारांना या परिसरात जाण्यास मनाई करण्यात आला आहे.