मादागास्कर : आफ्रिकन देश मादागास्करमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मादागास्करमध्ये आयोजित इंडियन ओशन आयलँड गेम्स (IOIG) च्या उद्घाटन समारंभात चेंगराचेंगरी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चेंगराचेंगरीत १२ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ८० जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्राध्यक्षांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जनतेने शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मादागास्करच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मादागास्करमधील बारिया स्टेडियमवर इंडियन ओशन आयलँड गेम्सचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी सुमारे ५० हजार प्रेक्षक आले होते. यादरम्यान स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला. मादागास्करचे पंतप्रधान ख्रिश्चन एनत्से रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘चेंगराचेंगरीत सुमारे ८० लोक जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे.’
12 killed, 80 injured in Madagascar stadium stampede
Read @ANI Story | https://t.co/p01FGeZIbr #Madagascar #Stampede pic.twitter.com/ucce2Oyq74
— ANI Digital (@ani_digital) August 25, 2023
मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्राध्यक्षांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली. अनेक जण जखमी झाले आहेत. शोक व्यक्त करताना राष्ट्रपतींनी शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीचे खरे कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, राष्ट्रपतीच्या शांततेच्या आव्हानानंतर लेझर शो आणि फटाक्यांची आतषबाजी करून हा सोहळा सुरूच होता. इंडियन ओशन आयलँड गेम्स मादागास्करमध्ये ३ सप्टेंबरपर्यंत होणार आहेत. या कार्यक्रमात मॉरिशस, सेशेल्स, कोमोरोस, मादागास्कर, मेयोट, रीयुनियन आणि मालदीवमधील खेळाडू सहभागी झाले होते.