कलेढोण – गारळेवाडी (ता. खटाव) येथील श्री सिद्धनाथ गजी मंडळाचे प्रमुख व सुप्रसिद्ध ढोले कै. रघुनाथ (बापू) विश्वनाथ गारळे उर्फ रघु ढोले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानीचे अनावरण दि. 22 एप्रिल रोजी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे व माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कै. रघुनाथ गारळे गजी नृत्य कलेतील एक निपुण असे व्यक्तीमत्व होते. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या बापूंनी गजी नृत्य कलेच्या माध्यमातून गारळेवाडी गावचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गारळेवाडी येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्यांनतर सकाळी 10 वाजता हभप दादासो जानकर महाराज जांभुळणीकर यांचे कीर्तन होणार आहे. त्यांनतर 11.55 मिनिटांनी फुलाचा कार्यक्रम होईल. तसेच 12 वाजता प्रवेशद्वाराचे अनावरण होणार आहे. दरम्यान 12 ते 2 या वेळेत पंचक्रोशीतील आलेल्या नामांकित गजी मंडळाचा गजाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी पंचक्रोशीतून विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच गजीन्रुत्य प्रेमी, रघुनाथ बापू प्रेमी व विविध गजी मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन टी. आर. गारळे व श्री सिद्धनाथ गजी मंडळ तसेच ग्रामस्थांनी केले आहे.