“डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाईंबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील”
भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर; पक्षविरोधी काम करणाऱ्यांची गय नाही
सातारा (प्रतिनिधी) – माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावर व अनिल देसाई यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याने ते अडगळीत आहेत. त्यांच्याबाबत प्रदेश पातळीवरून निर्णय घेतला जाईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी रविवारी स्पष्ट केले.
सत्तेत येऊन वर्षपूर्ती करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत भाजपची भूमिका मांडण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. रणजित मोहिते-पाटील, दत्ताजी थोरात आदी उपस्थित होते.
माण तालुक्यात पक्षाला गळती लागली असून पक्षातील नेते डॉ. येळगावकर व देसाई यांच्याकडे काही जबाबदारी सोपवून ही गळती थांबणार का? या दोन्ही नेत्यांना अडगळीत टाकण्याचे कारण काय, असे विचारले असता, पावसकर म्हणाले, डॉ. येळगावकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत; परंतु त्यांनी व अनिल देसाई यांनी विधानसभा निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केले होते. हे भाजपच्या शिस्तीला धरून नाही. जो कोणी पक्षाच्या विरोधात काम करेल, त्याला शिक्षा मिळणारच. भाजपमध्ये नेता, कार्यकर्ता असा भेद केला जात नाही. पुढचा कोण आहे, हे पाहून निर्णय घेतले जात नाहीत.
डॉ. येळगावकर व देसाई यांनी पक्षविरोधी कारवाया करून आपलेच नुकसान करून घेतले आहे. त्यांचे पक्षातील भवितव्य काय, या प्रश्नावर पावसकर म्हणाले, या दोघांच्या बाबती प्रदेश पातळीवरून निर्णय घेतला जाईल. त्याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. त्यावर, जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय, या प्रश्नावर पावसकर यांनी स्मितहास्य करून वेळ मारून नेली.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा