मुंबई – राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटातील नेत्यांवर ईडीकडून अनेक गुन्हे दाखल केले जात आहेत. यात काहींची चौकशी करण्यात आली असून, काहींना समन्स बजावण्यात आले आहेत. अशातच आता ठाकरे गटातील नेते अनिल देसाईंचे निकटवर्ती आणि खासगी सचिव दिनेश बोभाटेंविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. बोभाटे तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने तर ठाकरे गटाला धक्का देणारा ठरला. या निकालाचे विश्लेषण ठाकरे गटाने 16 जानेवारी रोजी महापत्रकार परिषद घेऊन केले. त्यांनंतर ठाकरे गटाच्या अडचणीत खऱ्या अर्थाने वाढ झाल्याचे बोलले जात आहे. कारण, 17 जानेवारी रोजी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली.
त्यानंतर राजन साळवी यांच्यावर एसीबीने छापेमारी केली. याआधी खासदार संजय राऊत, किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आता ठाकरेंच्या एका मोहऱ्याची भर पडली आहे. ते आहेत अनिल देसाई. कारण, अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटेंविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.