पुणे -करोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या. करोना बाधित आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धतेसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहे, असेही पवार यांनी सांगितले.
विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्यासह पिंपरी-चिंचवड येथील अधिकारी उपस्थित होते.
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असे सांगत पवार म्हणाले, प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक सुविधांमध्ये तातडीने वाढ करा. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढू नये म्हणून सजग राहून नियोजन करणे आवश्यक आहे. आवश्यक तिथे खाटांची गरज, उपलब्धता व इतर सामग्री यासाठी सतत समन्वय ठेवावा.
अन्नधान्य पुरवठा सुरू
करोना संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याचे मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना त्याचा लाभ होईल, असेही पवार म्हणाले.
लस केंद्रांवर गर्दी करू नये
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधीची तरतूद केलेली आहे. परंतू लसीची उपलब्धता मर्यादित असल्याने नागरिकांनी लगेचच लस केंद्रांवर गर्दी करू नये. को-विन ऍपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असे पवार म्हणाले.