क्रिकेट कॉर्नर : खिलाडू वृत्तीचे दर्शन

– तुषार घाडगे

करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य व्यवस्था प्रभावित झाली आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्‍सिजनची कमतरता भासत असल्याने शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत अनेकांनी खिलाडू वृत्तीने कोविड-19 पीडितांसाठी मदतीचा हात दिला आहे.

क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 200 ऑक्‍सिजन कन्संट्रेटर्स दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सचिन तेंडुलकरने 1 कोटी, तर आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचाइजीने अडीच कोटींची मदत जाहीर केली आहे.

देशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागात मेडिकल इंफ्रास्ट्रक्‍चरची नित्यंत गरज आहे. ही गरज ओळखून हार्दिकने 200 ऑक्‍सिजन कन्संट्रेटर्सची मदत जाहीर केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील कोविड-19 पीडित नागरिकांना काही प्रमाणात सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही “मिशन ऑक्‍सिजन’साठी 1 कोटी रुपयांची मदत दिली आहे. ही संस्था 250हून अधिक युवा उद्योजकांनी स्थापन केली आहे. या संस्थेच्या मदतीने विदेशातून ऑक्‍सिजन कन्संट्रेटर्स आयात करत थेट रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील एनजीओ हेमकुंत फाउंडेशन आणि उदय फाउंडेशनला दीड कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. या संस्थांकडून ऑक्‍सिजन सिलिंडरसह करोनाबाधितांच्या उपचारासाठी गरजेच्या वैद्यकीय सुविधा देण्यात येत आहेत.

देशातील करोना महामारीत क्रीडापटूंनी केलेली ही मदत निश्‍चितच गौरवास्पद आहे. कोविड-19विरोधात संपूर्ण जग लढा देत असताना परिस्थितीचे भान राखत दाखविलेली ही खिलाडू वृत्ती सर्वसामान्यांसाठी नक्‍कीच उभारी देणारी ठरेल.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.