ट्रकचालकाचा मुलगा विधानसभेचा उमेदवार

सुपा  – निवडणुका या नशीब आजमावण्याचा एक प्रकार आहे. यामध्ये कोणाचे नशीब कधी उघडेल, हे सांगता येत नाही. पारनेर तालुक्‍यातील हंगा येथील युवक प्रसाद खामकर यास जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. ट्रकचालकाचा मुलगा असलेले प्रसाद महाविद्यालयीन शिक्षण घेताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होते. आता तेही या निवडणुकीत नशिब आजमावित आहेत.

पारनेर तालुक्‍याचा भाग प्रामुख्याने शिक्षण, सैनिक व कामगारांचा भाग म्हणून ओळखला जातो. हंगा हे पारनेर-सुपा रस्त्यालगत असलेले गावही त्याला अपवाद नाही. याच गावातील बापू आणि लक्ष्मी खामकर यांचा प्रसाद हा धाकटा मुलगा. प्रसाद यांना दोन बहिणी. दोघींचे विवाह झालेले. एकुलता एक मुलगा असलेल्या प्रसाद खामकर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी म्हणून काम केले आहे.

घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आणि परंपरागत व्यवसायातून आणि कोरडवाहू शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने बापू खामकर यांनी ट्रकचालक म्हणून, तर त्यांच्या पत्नी लक्ष्मी खामकर यांनी गृहिणी बनून घर संभाळले व शेतात काम केले. याच तालुक्‍याच्या मतदारसंघाची निवडणूक आपला मुलगा कधी लढवू शकेल, हे त्यांच्या स्वप्नात ही नव्हते. आता त्यांचा मुलगा जनता पक्षाचा उमेदवार आहे. प्रसाद खामकर यांच्या हंगा येथील घरी भेट दिली असता त्यांच्या आई लक्ष्मी घरी होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.