भाजप 371 कलमाबद्दल गप्प का? : पवार

कोपरगाव – देशाच्या पंतप्रधानांची 56 इंचाची छाती असल्याचे सांगून 370 कलम हटविल्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत आणून भाजप सरकार मुळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करीत आहे. एका काश्‍मिरमधील 370 कलम हटविले, त्याला आम्ही सभागृहामध्ये सहमती दिली. मात्र 371 कलमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरंक्षणमंत्री अमित शहा गप्प का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपरगाव येथील प्रचार सभेत केला.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सोमवारी सायंकाळी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे, जिल्हा बॅकेच्या संचालिका चैताली काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे, संजीव भोर, सभापती अनुसया होन, माजी नगराध्यक्ष पद्‌माकांत कुदळे, मंगेश पाटील, डॉ.अजय गर्जे, अशोक खांबेकर आदींची उपस्थिती होती. पवार पुढे म्हणाले, राज्यात शेतकरी देशोधडीला लागला, अनेक कारखाने बंद पडत असल्याने कामगारांच्या हाताला काम मिळेना, उद्योगधंदे डबघाईला आले, बाजारपेठा ओस पडत आहेत, शेती सिंचनाचा प्रश्‍न राज्यात गंभीर झाल्याने शेतमालाला भाव मिळेना.

त्यामुळे 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बुलढाण्यामध्ये एका तरूण शेतकऱ्याने भाजप पक्षाचे कमळ चिन्ह असलेला टि- शर्ट घालुन गळफास घेवुन आत्महत्या करीत मुख्यमंत्र्यांचे अशा प्रकारे स्वागत केले. अशा अनेक गंभीर समस्या असतांना मोदी व शहा हे 370 कलम हटविल्याचे सांगुन महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची दिशाभुल करीत आहेत. देशातील 9 राज्यामध्ये 371 कलम लागु आहे.त्या बद्दल कोणीच काही बोलत नाही. असे ते म्हणाले.

पवार म्हणाले, त्यांच्या हातात सत्ता आल्याने सत्तेचा गैरवापर करून सुडबुध्दीचे राजकारण भाजप करीत आहे. मोदी व शहा हे फक्त शरद पवार याच नावावर टिका करीत आहेत.दुसरा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नाही. माझी त्यांना भीती वाटत असावी म्हणूनच ते झोपेत सुध्दा माझे नाव घेतात की काय? माझ्यावर ईडीची चौकशी लावली. पण त्याच ईडीने माझ्यापुढे हात जोडले. पण मी झुकलो नाही. येत्या निवडणुकीत जर सत्ता परिवर्तन झाले तर या ईडीचा उपयोग कोणी तुमच्या बद्दल करू नये अशी अशा व्यक्त केली.

या राज्याला भविष्यासाठी तरूण कर्तृत्वान नेतृत्वाची गरज असल्यामुळे आशुतोष काळे यांना कोपरगावमधून उमेदवारी दिली. आशुतोष काळेंच्या रूपातून मला माझ्या पहिल्या निवडणुकीची आठवण झाली.त्यावेळी सन 1978 साली माझ्या पाठीमागे स्व.शंकरराव काळे उभे होते. स्व.काळे यांनी आपले विचारतत्व कधी सोडले नाही. त्या विचाराचा उमेदवार आशुतोष काळे आहे. आता त्यांच्यापाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे. असे म्हणून काळे हे निवडून येणार असल्याची खात्री पवार यांनी व्यक्त केली.

काळे म्हणाले, कोपरगावच्या विद्यमान आमदार निष्क्रिय आहेत. त्या कर्तृत्वापेक्षा लाटेवर निवडून आल्या होत्या. त्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना सरणावर बसण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यामध्ये समृध्दी महामार्गाच्या स्मार्ट सिटीचे राजकारण करून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे.

स्मार्ट सिटी कोणी घालवली. याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत. मी ही आमदारकीची निवडणूक माझ्या हौसेसाठी लढत नसून मतदारसंघातील जनतेच्या भल्यासाठी लढत आहे, असेही ते म्हणाले. या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

पाटील, गर्जे, डागांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक डॉ. अजय गर्जे, भाजपचे तालुका सरचिटणीस संतोष डागा यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत आशुतोष काळे यांना पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने कोल्हे गटाला मोठा धक्का बसला आहे.  

Leave A Reply

Your email address will not be published.